रत्नागिरी : वारंवार दारू पिणे चांगले नाही असा सल्ला जर तुम्ही कोणा मित्राला देत असाल तर सावधान. कारण असा असा सल्ला देणाऱ्याच्या जीवावर बेतल्याची एक घटना राजापूर येथे घडली आहे.
वारंवार दारु पिऊ नकोस, कामधंदा कर असे सांगितल्याचा राग धरुन एकाला बांबूने डोक्यात मारहाण करुन जखमी केल्याची घटना येथे घडली आहे . याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ विश्राम परवडी (धोपेश्वर, तिठवली राजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद विश्राम धोंडू परवडी (धोपेश्वर, तिठवली राजापूर) यांनी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ परवडी याला दारुचे व्यसन आहे. त्याची दारु सुटावी यासाठी विश्राम परवडी यांनी दारु सोडण्यास सांगितले. याचा राग विश्वनाथ याच्या मनात होता. 24 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान विश्राम परवडी हे काजूच्या बिया जमा करत असताना विश्वनाथ परवडी तिथे आला त्याने रागात हातातील बांबूच्या काठीने विश्राम यांच्या डोक्यात दोन फटके मारुन दुखापत केली. तसेच पाठीतही एक फटका मारुन मुका मार लागला. मी दारु पिऊन येईन व काहीही करेन मला काही सांगायचे नाही असे म्हणत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत विश्राम परवडी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विश्वनाथ याच्यावर भादविकलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vision Abroad