Railway Reservation Fraud : कोकण रेल्वे तिकीट आरक्षणामध्ये काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असून त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. या काळाबाजार प्रकरणी रेल्वे पोलीसांनी बुधवारी सावंतवाडी येथील एका युवकाला ताब्यात घेतले होते. त्या युवकाला ताब्यात घेत त्याच्यावर रेल्वे ऍक्ट नुसार १४३ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती रेल्वे पोलीस निरीक्षकांनी दिली. अक्षय देशपांडे ( वय – ३० ) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि मडगाव रेल्वे पोलीसच्या पथकास सावंतवाडी येथील एका ऑफिसमध्ये तिकिटांचा काळाबाजार चालत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी या ऑफिसवर धाड टाकली. या धाडीत मिळालेल्या माहितीनुसार येथे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याच्या संशयावर हे ऑफिस चालवीत असलेल्या या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे रेल्वे तिकीट बुकिंग आयडी देखील ब्लॉक केले गेले आहे . रेल्वे ऍक्ट १४३ नुसार दाखल गुन्ह्यामध्ये ३ वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. दरम्यान संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू आहे.
Vision Abroad