Author Archives: Kokanai Digital

Mumbai:‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ देणार्‍या ‘पॉड टॅक्सी’ सेवा सुरू करण्याबाबत मोठी अपडेट

   Follow us on        

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश (MMR) मध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मेट्रो-लोकलसारख्या मुख्य सार्वजनिक वाहतुकीला पूरक अशी ‘पॉड टॅक्सी’ सेवा सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत MMR क्षेत्रातील महापालिकांना पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश प्रवाशांना घरापासून थेट कामाच्या ठिकाणापर्यंत सुलभ आणि जलद पोहोच उपलब्ध करून देणे आहे. सध्या मेट्रो किंवा लोकलने उतरल्यानंतर ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी रिक्षा, बस किंवा इतर वाहनांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे वाहतूक कोंडी वाढते आणि प्रवाशांना त्रास होतो. पॉड टॅक्सी ही अत्याधुनिक, ड्रायव्हरलेस आणि इलेक्ट्रिक आधारित सेवा असून, ती उन्नत मार्गावर (elevated track) धावेल. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल आणि प्रदूषण नियंत्रणातही मदत होईल.उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत स्पष्ट केले की, पॉड टॅक्सी सेवा मेट्रोच्या वापराला प्रोत्साहन देईल आणि खासगी वाहनांची संख्या रस्त्यावर कमी होईल. त्यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या शहरांमध्ये या सेवेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यावर भर दिला. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) भागात आधीच पॉड टॅक्सीचा प्रकल्प मंजूर झाला असून, त्याचा विस्तार MMR क्षेत्रात करण्याचे नियोजन आहे.

एमएमआरडीए (Mumbai Metropolitan Region Development Authority) या प्रकल्पाची प्रमुख संस्था असून, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलअंतर्गत तो राबवला जाणार आहे.नोव्हेंबर २०२५ मध्ये राज्य सरकारने ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर जोडणारी भारतातील पहिली पॉड टॅक्सी नेटवर्क मंजूर केली होती. या प्रकल्पामुळे लाखो प्रवाशांना जलद, पर्यावरणस्नेही आणि स्वस्त प्रवासाची सुविधा मिळेल.

या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे. लवकरच आराखडे तयार होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

कोकण मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसच्या क्षमतेत वाढ; तब्बल ६ कोच वाढवले!

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा ओघ प्रचंड असतो, मात्र अनेक गाड्या कमी डब्यांच्या (उदा. १६ किंवा १८ डबे) चालवल्या जात होत्या. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना आरक्षण मिळणे अशक्य व्हायचे. मात्र कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तिरुनेलवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)  (२२६३० / २२६२९) एक्सप्रेसच्या प्रवाशांना कोकण रेल्वेने एक आनंदाची बातमी दिली आहे. या गाडीची क्षमता आता १६ डब्यांवरून २२ डब्यांपर्यंत वाढवण्यात आली असून, दक्षिण रेल्वेने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे.

नवीन डब्यांची रचना (Coach Composition):

डब्याचा प्रकार पूर्वीची स्थिती (Existing)
आताची सुधारित स्थिती (Revised)
एसी २ टायर (2 Tier AC) ०१ डबा ०२ डबे
एसी ३ टायर (3 Tier AC) ०२ डबे ०६ डबे
एसी ३ टायर इकॉनॉमी (3E) ०१ डबा
०१ डबा (बदल नाही)
स्लीपर क्लास (Sleeper) ०६ डबे ०७ डबे
जनरल क्लास (General) ०४ डबे
०४ डबे (बदल नाही)
जनरेटर कार / एसएलआर ०२ डबे
०२ डबे (बदल नाही)
एकूण डबे (Total Coaches) १६ एलएचबी (LHB)
२२ एलएचबी (LHB)

 

बदल कधीपासून लागू होणार?

  • गाडी क्र. २२६३० (तिरुनेलवेली येथून): १५ एप्रिल २०२६ पासून.

  • गाडी क्र. २२६२९ (लोकमान्य टिळक टर्मिनस येथून): १६ एप्रिल २०२६ पासून.

या निर्णयामुळे तिरुनेलवेली – एलटीटी एक्सप्रेसच्या प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. रेल्वेने केलेल्या बदलांनुसार, एसी ३ टायरच्या डब्यांमध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली असून, त्यांची संख्या आता २ वरून थेट ६ करण्यात आली आहे. तसेच, एसी २ टायरची संख्या १ वरून २ करण्यात आली असून, स्लीपर क्लासचा १ डबा वाढवून आता एकूण ७ स्लीपर डबे या गाडीला जोडले जातील. अशा प्रकारे या ट्रेनमध्ये एकूण ६ नवीन डबे कायमस्वरूपी वाढवण्यात आले आहेत. डब्यांच्या या लक्षणीय वाढीमुळे विशेषतः उन्हाळी सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांची वेटिंग लिस्ट कमी होण्यास आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होण्यास मोठी मदत होणार आहे.

कोकण विकास समितीचा पाठपुरावा:

कोकण विकास समितीचा पाठपुरावा: काही काळापूर्वी या गाडीचे टर्मिनल दादरवरून लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे हलवण्यात आले होते. दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या मर्यादेमुळे या गाडीला जास्त डबे जोडण्यात अडचणी येत होत्या. टर्मिनल बदलल्यामुळे हा तांत्रिक अडथळा दूर झाला होता. याच संधीचा फायदा घेत कोकण विकास समितीने ही गाडी २२ डब्यांची करावी, अशी आग्रही मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. समितीच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांचा मालवण – कणकवली ‘विशेष दौरा’ उत्साहात पार

   Follow us on        
सिंधुदुर्ग: मानवता विकास परिषद अध्यक्ष, रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण- कणकवली दौरा संपन्न झाला. या दरम्यान श्रीकांत सावंत यांनी  मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबियांच्या श्री देवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला भेट दिली. त्यांनी श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेतले व उपस्थितांशी भेटी घेत चर्चा केली. श्रीकांत सावंत यांनी या दौर्यात राजकीय नेत्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत चर्चा केली.
त्यांनी मालवण येथे नगरपरिषद निवडणुकीतील विजयाबद्दल नगरसेवक मंदार केणी यांची भेट घेत अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. वेरली सरपंच धनंजय परब यांचेही त्यांनी अभिनंदन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकांमधल्या विजयाबद्दल श्रीकांत सावंत यांनी क्षमा हडकर यांचा शाल देऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत भय्यु प्रभुगावकर व संदीप हडकर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ. शर्मिला पिंपळोलकर यांची निवड झाल्याबद्दल देखिल श्रीकांत सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, श्रीकांत सावंत यांनी वरीष्ठ वकिल श्री. समीर गवाणकर व मसुरे येथे डाॅ. अनिरुद्ध मेहेंदळे, हाॅटेल व्यावसायिक संजय गावडे यांचीही सदिच्छा भेट घेतली.
श्रीकांत सावंत यांनी या दौऱ्यातील गाठी भेटी अत्यंत सकारात्मक होत्या असे सांगितले आणि समाजाला  मानवता, धर्म आणि राष्ट्र यांच्या प्रती जागृतीसाठी राष्ट्रसंत परमपूज्य पाचलेगांवकर महाराजांना अभिप्रेत कार्य करत रहायचा आग्रह सुरू ठेवायचे आवाहन केले. यावेळी श्रीकांत सावंत यांनी भेट घेतलेल्या विविध मान्यवरांना राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराजांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित तसेच श्रीकांत सावंत मुख्य संपादक असलेला संचारेश्वर विशेषांक सदिच्छा भेट स्वरुपात दिला.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची धावपळ थांबणार; ‘डिजिटल कोच इंडिकेटर’चे काम अखेर सुरू!

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘डिजिटल कोच इंडिकेटर’ बसवण्याचे काम आता प्रत्यक्ष सुरू झाले आहे. गेल्या वर्षी २६ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या रेलरोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि १७ मार्च २०२५ रोजी कोकण रेल्वे महामंडळाच्या बेलापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या सुविधेबाबत ठोस निर्णय घेण्यात आला होता.

या कामाची टेंडर प्रक्रिया २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या डिजिटल इंडिकेटरमुळे प्रवाशांना आपली गाडी स्थानकात आल्यावर आपला डबा (कोच) नेमका कोणत्या ठिकाणी येणार आहे, याची अचूक माहिती मिळणार आहे. यामुळे प्रवाशांची होणारी धावपळ थांबणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे. स्थानकावर यापूर्वी लिफ्टची सुविधा उपलब्ध झाली असून, आगामी काळात प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर १७० मीटरची निवारा शेड देखील उभी राहील, असा विश्वास संघटनेचे उपाध्यक्ष श्री. सागर तळवडेकर यांनी व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिल्या ‘५-स्टार हॉटेल’ प्रकल्पाला गती देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची आढावा बैठक

   Follow us on        

मुंबई​: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ताज समूहाकडून (IHCL) प्रस्तावित असलेल्या पहिल्या पंचतारांकित रिसॉर्ट प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मुंबईत एक विशेष बैठक पार पडली. सिंधुदुर्गचे आमदार मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि उपस्थितीत ही बैठक झाली.

​या प्रकल्पाची प्रक्रिया २०२५ मध्ये वेगाने सुरू झाली होती. २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर, प्रशासकीय स्तरावर कामात सुसूत्रता आणण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जमीन अधिग्रहण, पर्यावरणीय परवानग्या आणि स्थानिकांचा सहभाग यावर सखोल चर्चा करण्यात आली.

​वेंगुर्ळा तालुक्यातील शिरोडा-वेलाघर परिसरात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

​आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास:

​”सिंधुदुर्ग हा निसर्गसंपन्न जिल्हा असून पर्यटनाच्या दृष्टीने यात मोठी क्षमता आहे. ताज सारखा जागतिक ब्रँड शिरोडा-वेलाघर येथे आल्यास सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवीन उंची मिळेल. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि जिल्ह्याचा आर्थिक विकास होईल. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

​या बैठकीला पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गला ‘लक्झरी पर्यटन डेस्टिनेशन’ म्हणून जागतिक नकाशावर स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तिलारी वनक्षेत्रात वाघिणीसह दोन बछड्यांचा वावर

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील तिलारी वनक्षेत्रातून निसर्गप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. या भागात पहिल्यांदाच एका वाघिणीसह तिच्या दोन लहान बछड्यांच्या पाऊलखुणा वनविभागाला आढळून आल्या आहेत. या शोधामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वाघांचे केवळ वास्तव्यच नाही, तर तिथे वाघांचे नैसर्गिक प्रजनन होत असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. तिलारीचा हा परिसर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर असून तो वन्यजीवांसाठी अत्यंत महत्त्वाचा ‘कॉरिडॉर’ मानला जातो. वाघिणीसोबत बछड्यांचे अस्तित्व असणे हे या जंगलातील पोषक पर्यावरणाचे लक्षण आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने सतर्कता वाढवली असून, वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात शंभरहून अधिक ‘कॅमेरा ट्रॅप्स’ लावण्यात आले आहेत. व्याघ्र गणनेच्या कामात गुंतलेल्या पथकाला या पाऊलखुणा आढळल्या असून, वनविभागाने या क्षेत्रातील गस्त अधिक कडक केली आहे. या नव्या पाहुण्यांच्या आगमनामुळे तिलारी वनक्षेत्राला अधिकृतपणे ‘व्याघ्र राखीव क्षेत्र’ किंवा संरक्षित क्षेत्राचा दर्जा मिळण्याच्या मागणीला आता पुन्हा बळ मिळाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनाही सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, या वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

सावधान! ईथे फसवणूक होण्याची शक्यता; कोकण रेल्वे प्रशासनाचे दक्षतेचे आवाहन

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. काही अनधिकृत व्यक्ती आणि एजंट रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे खोटे आश्वासन देऊन नोकरी इच्छुकांकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे.

 

या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे की, त्यांनी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला नोकरी देण्यासाठी किंवा त्याबदल्यात पैसे गोळा करण्याचे अधिकार दिलेले नाहीत. रेल्वेतील सर्व भरती प्रक्रिया ही केवळ अधिकृत नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीनेच राबवली जाते. कोणत्याही मध्यस्थाचा या प्रक्रियेशी संबंध नसून अशा दाव्यांना बळी पडू नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

 

नोकरी संदर्भातील सर्व अधिकृत माहिती आणि अपडेट्ससाठी केवळ konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा. अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास त्याची तातडीने तक्रार करावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

Western Railway: प्राण्यांचे रुळांवर होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वेचे मोठे पाऊल

   Follow us on        

मुंबई: रेल्वे प्रवासाची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि रुळांवर होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या विविध रेल्वे मार्गांवर, विशेषतः जिथे जनावरे रुळावर येण्याचे प्रमाण जास्त आहे, अशा ३३७.५ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात मेटल बिमचे (Metal Beam Fence) कुंपण उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे गाड्यांच्या वेगातील अडथळे दूर होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवर रुळांवर जनावरे आडवी आल्यामुळे अनेकदा गंभीर अपघात घडले आहेत. विशेषतः ‘वंदे भारत’ सारख्या अत्याधुनिक आणि हायस्पीड गाड्यांना अशा घटनांमुळे मोठ्या तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला होता. अनेक वेळा इंजिनचे नुकसान झाल्याने गाड्यांचे वेळापत्रक कोलमडत असे. ही समस्या कायमची मार्गी लावण्यासाठी पश्चिम रेल्वेने युद्धपातळीवर कुंपण घालण्याचे काम हाती घेतले होते, जे आता यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या कुंपणामुळे जनावरांना रुळावर प्रवेश करणे अशक्य होणार असून, यामुळे इंजिनची हानी टळणार आहे.

​केवळ जनावरांची सुरक्षाच नव्हे, तर मानवी चुकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठीही हे कुंपण अत्यंत प्रभावी ठरणार आहे. रेल्वे रुळांवरून होणारी अनधिकृत ये-जा आणि रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात होणारे अपघात यामुळे कमी होतील. या संरक्षण भिंतीमुळे रेल्वे चालकांना (Loco Pilots) कोणत्याही अडथळ्याविना गाड्या त्यांच्या पूर्ण क्षमतेने चालवता येतील, ज्याचा थेट फायदा रेल्वेच्या वक्तशीरपणावर होईल. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वे वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे, असे मानले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचा ६०० कोटींचा विकास आराखडा मंजूर; बैठकीत अभिनंदनाचा ठराव

   Follow us on        

ओरोस:सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे काल जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आराखडा ६०० कोटी रुपयांच्या पुढे नेल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले असून, या ऐतिहासिक टप्प्याबद्दल बैठकीत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या वाढीव निधीमुळे जिल्ह्याच्या प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. यावेळी बोलताना, निधीची उपलब्धता वाढल्याने प्रशासकीय यंत्रणेने आता अधिक सक्रिय होऊन कामाला गती द्यावी आणि विकासकामांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

​या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांसह विविध शासकीय विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला असून, प्रशासनाला कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Video: आता रस्ता गाणार! मुंबईच्या कोस्टल रोडवर देशातील पाहिल्या ‘म्युझिकल’ रस्त्याचे लोकार्पण

   Follow us on        

मुंबई: मुंबईच्या कोस्टल रोडवर (धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड) देशातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे (म्युझिकल रोड) आज लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दुपारी १२:३० वाजता या ५०० मीटर लांबीच्या खास रस्त्याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

​कसा आहे हा संगीतमय रस्ता?

हा रस्ता नरिमन पॉइंट ते वरळी दिशेकडील (उत्तर वाहिनी) भूमिगत बोगद्याच्या बाहेर पडल्यानंतर, पहिल्या लेनमध्ये (डिव्हायडरजवळ) ५०० मीटर अंतरावर तयार करण्यात आला आहे. जेव्हा एखादे वाहन या पट्ट्यावरून ताशी ६० ते ८० किमी वेगाने धावते, तेव्हा टायर आणि रस्त्यावरील खास ग्रूव्ह्ज (रंबल स्ट्रिप्स) यांच्यातील घर्षणामुळे ऑस्कर विजेते ‘जय हो’ हे गाणे कारच्या आत स्पष्टपणे ऐकू येते.

​प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

​संकल्पना: या प्रकल्पाची मूळ संकल्पना माजी खासदार राहुल शेवाळे यांची होती.

​खर्च: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सुमारे ६ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण केला आहे.

​जागतिक स्थान: जपान आणि दुबईसारख्या देशांनंतर अशा प्रकारचा प्रयोग करणारा हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच रस्ता ठरला आहे.

​उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडीतून प्रवास करून या संगीतमय धूनचा अनुभव घेतला. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, “हा केवळ एक रस्ता नसून मुंबईच्या आधुनिकतेचे प्रतीक आहे. पहिल्या टप्प्यात ५०० मीटरचा भाग पूर्ण झाला असून, भविष्यात याचा विस्तार करण्याचा विचार आहे.”

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search