मुंबई: मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या विना-एसी (Non-AC) पण स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल ट्रेनची चाचणी मुंबईत न होता थेट उत्तर प्रदेशात घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दी आणि गाड्यांची सततची वर्दळ यामुळे चाचणीसाठी पुरेसा वेळ आणि मार्ग उपलब्ध होत नसल्याने हा बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील झाशी विभागांतर्गत येणाऱ्या खजुराहो-महोबा या ६३.२७ किलोमीटरच्या मार्गावर या अत्याधुनिक लोकलची सखोल तांत्रिक चाचणी सध्या सुरू आहे.
मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये या लोकलचा पहिला रेक प्राथमिक तपासणीसाठी आधीच दाखल झाला आहे. मात्र, दुसऱ्या रेकची सविस्तर चाचणी करण्यासाठी रेल्वेने उत्तर भारतातील कमी रहदारीच्या मार्गाची निवड केली. मुंबईत दिवसा लोकल आणि मेल-एक्स्प्रेसमुळे चाचणी घेणे अशक्य असते, तर रात्रीच्या वेळी उपलब्ध होणारा मर्यादित वेळ तांत्रिक निरीक्षणांसाठी अपुरा पडतो. याउलट, खजुराहो-महोबा मार्ग तांत्रिक चाचण्यांसाठी अधिक अनुकूल असून तिथे सलग आणि निर्बाधपणे रेल्वेच्या सर्व प्रणाली तपासणे सोपे जात आहे.
या चाचणी दरम्यान प्रामुख्याने स्वयंचलित स्लायडिंग दरवाजांची अचूकता, इंटरलॉकिंग सुरक्षा प्रणाली (ज्यामुळे दरवाजे बंद झाल्याशिवाय गाडी सुरू होणार नाही) आणि दरवाजे उघडण्या-बंद होण्याचा वेळ यांचे बारकाईने परीक्षण केले जात आहे. विना-एसी डब्यांमध्ये दरवाजे बंद असताना हवा खेळती राहण्यासाठी छतावरील ब्लोअर्स आणि ‘फोर्स्ड व्हेंटिलेशन’ प्रणाली किती प्रभावी ठरते, यावरही विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच पावसाळ्यात पाणी डब्यात शिरू नये यासाठी ‘अँटी-वॉटर इन्ग्रेस’ प्रणालीचीही चाचणी घेतली जाणार आहे. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर हा रेक पुन्हा मुंबईत आणला जाईल आणि त्यानंतरच प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.


