सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या उन्हाळी पर्यटन हंगाम जोरात सुरू असल्याने पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. या वाढत्या मागणीमुळे मध्यंतरी इंधन पुरवठ्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घेतली असून इंधन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOCL) या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सातत्याने समन्वय साधला जात असून, जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा स्थिर करण्यात येत आहे.
घाबरून गर्दी करू नका
इंधन टंचाईबाबत जिल्ह्यात सध्या काही चुकीच्या अफवा पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या अफवांमुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होत आहे. अशा प्रकारची अनावश्यक गर्दी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करू शकते, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नागरिकांनी इंधन खरेदीसाठी संयम बाळगावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सावंतवाडीतील इंधन स्थिती आणि नवीन साठा
जिल्ह्यातील विविध भागांत इंधन उपलब्ध असून, विशेषतः सावंतवाडी परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. सध्या आरोंदा (१), तळवडे (१), सावंतवाडी शहर (४), मळगाव (२), आंबोली (२) आणि कारिवडे (१) अशा विविध ठिकाणी पेट्रोल पंप कार्यान्वित आहेत. सावंतवाडी शहरातील दोन पंपांवर सध्या साठा संपला असला तरी, त्यापैकी बी.जी. भांगले पेट्रोल पंपावर आज रात्री १० हजार लिटर पेट्रोल, ५० हजार लिटर पॉवर पेट्रोल आणि ५ हजार लिटर डिझेलचा साठा प्राप्त होणार आहे. तसेच भट पेट्रोल पंपानेही साठ्याची मागणी नोंदवली असून लवकरच तिथेही पुरवठा उपलब्ध होणार आहे.
एकूणच जिल्ह्याचा इंधन पुरवठा नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.


