रेल्वे रूळांवरील अपघातांना ब्रेक लावण्यासाठी अनोखा प्रयोग! भिवंडीत बनणार देशातील पहिला ‘जलरोधक’ सबवे’

   Follow us on        

मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वे रुळांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचे मृत्यू रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पादचारी पुलांच्या (FOB) पर्यायाला मर्यादा आल्यानंतर महामंडळाने आता भुयारी मार्गांवर (सबवे) आपले लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्णपणे ‘जलरोधक’ (वाटरप्रूफ) सबवे भिवंडीत उभारण्यात येत आहे. महामुंबईतील पनवेल-वसई मार्गावरील भिवंडी स्थानकात हा ‘ऑल वेदर सबवे’ साकारत असून, त्याची लांबी ६८ मीटर आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबईतील सर्वाधिक अपघात होणाऱ्या संवेदनशील ठिकाणीही अशाच प्रकारच्या भुयारी मार्गांची उभारणी केली जाईल, अशी माहिती ‘एमआरव्हीसी’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी दिली.

​पादचारी पुलांकडे प्रवाशांचे दुर्लक्ष

रेल्वे रुळांवरील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ‘एमआरव्हीसी’ला मोठा अर्थपुरवठा केला जातो. महामंडळाने महामुंबईत सर्वाधिक अपघात होणाऱ्या ३६ ठिकाणी पादचारी पुलांची उभारणी केली आहे. मात्र, या पुलांची उंची साधारण ११ ते १२ मीटर इतकी जास्त असल्याने अनेक प्रवासी पुलाचा वापर न करता, जीव धोक्यात घालून थेट रुळ ओलांडण्याला प्राधान्य देतात. याउलट, भुयारी मार्ग हे जमिनीपासून अवघ्या चार ते पाच मीटर खाली बांधणे सहज शक्य असल्याने प्रवाशांसाठी ते अधिक सोयीचे ठरणार आहेत. आकडेवारीनुसार, सन २०२२ ते २०२५ दरम्यान मध्य रेल्वेवर एकूण ६,२२५ आणि पश्चिम रेल्वेवर ३,६२७ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी ‘एमयुटीपी ३’ अंतर्गत उपाययोजना पूर्ण झाल्या असून, नवीन संवेदनशील ठिकाणांचा समावेश ‘एमयुटीपी ४’ मध्ये केला जाणार आहे.

​असे आहे अत्याधुनिक जलरोधक तंत्रज्ञान

पावसाळ्यात अनेक सबवेमध्ये पाणी साचणे किंवा ओलावा येणे अशा समस्या उद्भवतात, ज्यामुळे प्रवासी त्याचा वापर करणे टाळतात. भिवंडी सबवेमध्ये ही अडचण दूर करण्यासाठी ‘त्रिस्तरीय जलरोधक तंत्रज्ञानाचा’ वापर करण्यात आला आहे. यामध्ये ४०० मिमी जाडीचे बॉक्स वापरण्यात आले असून, ‘कप अँड कोन’ पद्धतीच्या बॉक्स प्रणालीद्वारे ही भूमिगत संरचना जोडली जात आहे. पाणी झिरपण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी बॉक्सच्या सांध्यांमध्ये रबर गॅस्केट, विशेष जलरोधक रसायने आणि अतिरिक्त संरक्षक स्तर लावले जात आहेत. विशेष म्हणजे, हा पूर्व-पश्चिम जोडणारा भुयारी मार्ग ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’चे दोन मार्ग, दोन मेल-एक्सप्रेस आणि तीन लूप मार्गिका अशा एकूण सात रेल्वे मार्गिकांच्या खालून जाणार आहे. रेल्वे वाहतूक सुरू असतानाही रुळांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी रुळांखाली मजबूत लोखंडी गर्डर बसवून हे काम अत्यंत सुरक्षितपणे केले जात आहे

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search