सावंतवाडी:
‘ओंकार’ नावाच्या हत्तीचे पुन्हा एकदा वेत्ये गावात आगमन झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. रविवारी रात्री या हत्तीने वेत्ये येथे दर्शन दिल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाकडून यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओंकार हत्तीच्या सततच्या वावरामुळे वेत्ये आणि आसपासच्या परिसरातील शेतकरी, मजूर तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणारे नागरिक स्वतःला असुरक्षित समजत आहेत. हत्तीच्या या पुनरागमनामुळे ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढली आहे.
सरपंचांचा वनविभागावर संताप:
याच पार्श्वभूमीवर वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांनी वनविभागाच्या कारभारावर संतप्त शब्दांत तीव्र टीका केली आहे. ओंकार हत्तीच्या हालचालींची पूर्ण माहिती असूनही वनविभाग नेमके काय करत आहे? ग्रामस्थांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘हत्तीचा धुमाकूळ आणि प्रशासनाचा मौनकल्लोळ’ अशी चर्चा आता गावोगावी रंगू लागली आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने प्रभावी पावले उचलून हत्तीच्या हालचालींवर नियंत्रण मिळवावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात असून संपूर्ण परिसराचे लक्ष आता वनविभागाच्या भूमिकेकडे लागले आहे.


