मुंबई::मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. भाईंदर ते विरार दरम्यान सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूची (सी-लिंक) उभारणी करण्यात येणार असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा देशातील सर्वांत लांब सागरी पूल ठरणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सध्या २२ किलोमीटर लांबीचा ‘अटल सेतू’ हा देशातील सर्वात लांब सागरी पूल आहे. मात्र, भाईंदर-विरार सागरी सेतू या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर अटल सेतूचा हा विक्रम मोडीत निघणार आहे.
कसा असेल हा प्रकल्प?
मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या वांद्रे-वर्सोवा आणि वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडचे काम सुरू आहे. हाच मार्ग पुढे थेट विरारला जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) ‘उत्तन-विरार सागरी सेतू’ उभारला जाणार आहे.
मुख्य सागरी सेतूची लांबी: २४.३५ किलोमीटर
इंटरचेंज मार्ग (अंतरबदल मार्ग):३०.७७ किलोमीटर (एकूण ३ मार्ग)
उत्तन इंटरचेंज: ९.३२ किमी
वसई इंटरचेंज: २.५ किमी
विरार इंटरचेंज:१८.९५ किमी
अपेक्षित खर्च: सुमारे ५५ हजार कोटी रुपये
कामाची सद्यस्थिती आणि नियोजन
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय मान्यतेच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून १३ मार्च रोजी मंजुरी मिळाली आहे. सध्या वन विभागाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची (NOC) प्रतीक्षा असून, हे प्रमाणपत्र मिळताच पुढील निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे, तर २०२७ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या सागरी सेतूमुळे मुंबई ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुखकर होईल आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.


