​कोकणातील एसटी स्थानकांचा कायापालट! कणकवलीसह प्रमुख ठिकाणी ‘बस पोर्ट’ उभारले जाणार

   Follow us on        

कणकवली: कोकणातील एसटी प्रवाशांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कणकवली, विभागीय कार्यालय तसेच सावंतवाडी येथे पीपीपी (PPP) तत्त्वावर विमानतळाच्या धर्तीवरील अत्याधुनिक ‘बस पोर्ट’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. कणकवली बसस्थानकाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी स्थानक परिसराची पाहणी करून माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्यासह एसटी महामंडळाचे अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

​एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत परिवहन मंत्र्यांनी राज्यातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत करण्याची घोषणा केली असून, या स्थानकांची दर चार तासांनी स्वच्छता केली जाईल, असे स्पष्ट केले. याशिवाय, बसगाड्या यांत्रिक पद्धतीने स्वच्छ करूनच मार्गावर सोडल्या जातील. प्रवाशांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा, तर चालक व वाहकांसाठी गरम पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणखी एक मोठी घोषणा करताना त्यांनी सांगितले की, राज्यभरात ८ हजार नवीन बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यापैकी ६५ नवीन बसेस पुढील तीन महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार आहेत. तसेच, पर्यावरणपूरक वाहतुकीस चालना देण्यासाठी २०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात असलेल्या सुमारे ९०० रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर, १५ ऑगस्टपर्यंत कंत्राटी तत्त्वावर चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, तर १८ हजार कायमस्वरूपी पदांच्या भरतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी बसस्थानक परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली, ज्यावर परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search