मालवण: मध्यप्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेनंतर मालवण बंदर विभाग पूर्णपणे ‘ॲक्टिव्ह मोड’वर आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांची ने-आण करणाऱ्या बोटींवर कडक बंधने लादली होती. नवीन नियमांनुसार एका बोटीतून केवळ २० प्रवाशांना नेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या निर्णयामुळे स्थानिक बोट व्यावसायिक कमालीचे नाराज झाले होते.
कमी प्रवासी संख्या आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याची भूमिका व्यावसायिकांनी मांडली. इंधनाचे वाढते दर आणि देखभालीचा खर्च पाहता, केवळ २० प्रवाशांमुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. या मुद्द्यावरून बंदर विभाग अधिकारी आणि बोट व्यावसायिक यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.
अखेर या वादावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंची महत्त्वाची बैठक पार पडली. या चर्चेदरम्यान दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडली. चर्चेअंती हा वाद यशस्वीपणे मिटवण्यात आला असून, प्रशासनाने प्रवासी संख्येची मर्यादा २० वरून वाढवून ३० केली आहे. या निर्णयामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून पर्यटकांची वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे. यासोबतच सुरक्षेचे नियम पाळणे आणि पर्यटकांना लाईफ जॅकेट अनिवार्य करणे यावरही पुन्हा एकदा जोर देण्यात आला आहे.
Photo Credit – AI


