नवी दिल्ली:भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या थाटामाटात लाँच केलेले नवीन ‘RailOne’ अॅप सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जुलै २०२५ मध्ये CRIS द्वारे विकसित केलेले हे अॅप ‘अपग्रेडेड’ आणि ‘अधिक विश्वासार्ह’ असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तत्काल तिकीट बुकिंगच्या वेळी या अॅपला मोठ्या प्रमाणावर तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे की, सकाळी तत्काल बुकिंग सुरू होताच अॅपवर ‘कनेक्शन इश्यू’ आणि ‘अनेबल टू प्रोसेस रिक्वेस्ट’ (Unable to Process Request) असे संदेश दिसू लागतात, ज्यामुळे तिकीट बुक करणे अशक्य होत आहे.
सोशल मीडियावर रेल्वे प्रवाशांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, तत्काल कोटा सुरू होताच काही सेकंदांत सर्व सीट संपल्याचे दाखवले जाते, परंतु सामान्य प्रवाशांना मात्र बुकिंग प्रक्रियेत सतत अडथळे येतात. प्रवाशांच्या मते, नवीन अॅपपेक्षा जुने ‘IRCTC Rail Connect’ अॅप अधिक विश्वासार्ह होते. RailOne अॅपमध्ये अचानक लॉगआउट होणे, खात्यातून पैसे कापले जाऊनही तिकीट न मिळणे आणि सर्व्हर ओव्हरलोड होणे यांसारख्या गंभीर समस्या गेल्या अनेक आठवड्यांपासून कायम आहेत.
या तांत्रिक बिघाडामुळे सामान्य प्रवाशांचे मोठे नुकसान होत असून, नाईलाजास्तव त्यांना एजंट्सकडे धाव घ्यावी लागत आहे. एजंट्सकडून तिकीटासाठी अव्वाच्या सव्वा फी उकळली जात असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी सर्व्हरची क्षमता वाढवल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्ष कामाच्या वेळी तो फोल ठरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणात लक्ष घालून RailOne अॅपमधील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.


