मुंबई: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संशयित अन्न विषबाधेमुळे (फूड पॉयझनिंग) ही हृदयद्रावक घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या दोन मुली आयशा (१६) व जैनब (१३) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री डोकाडिया कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर एका नातेवाईकाने आणलेले तरबूजही त्यांनी खाल्ले. जेवणानंतर काही वेळातच कुटुंबातील या चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. विशेष म्हणजे, ज्या सदस्यांनी फक्त बिर्याणी खाल्ली होती, त्यांना कोणताही त्रास झाला नाही. मात्र, ज्यांनी बिर्याणी आणि त्यानंतर तरबूज खाल्ले होते, त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे पोलिसांचा संशय आता तरबूजावर अधिक बळावला आहे.
प्रकृती खालावल्याने या चौघांनाही तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना २६ एप्रिल रोजी दुर्दैवाने या चौघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. “अन्न विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एकाच घरातील हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


