रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वे पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे. मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेसची नियमित तपासणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. या कारवाईमुळे रेल्वेने प्रवास करून छुप्या पद्धतीने दारूची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि सी अँड आय स्टाफच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. गाडी रत्नागिरी स्थानकावर उभी असताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन व्यक्तींची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे असलेल्या साहित्याची तपासणी केली असता, त्यात एकूण १९१ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या सर्व बाटल्या पोलिसांनी तातडीने जप्त केल्या आहेत.
कोकण रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार, गोव्याहून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या मार्गावर सध्या दारूविरोधी कायद्यांची अत्यंत कडक अंमलबजावणी केली जात आहे. या दोन्ही आरोपींना प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करताना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.
प्रशासनाने या निमित्ताने सर्व प्रवाशांना कडक सूचना दिल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित वस्तूंची ने-आण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित, निर्विघ्न आणि सुरळीत पार पडावा यासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली आहे.


