ठाणे: कोकणात गावी जाण्यासाठी सध्या चाकरमान्यांची ‘तुफान गर्दी’ उसळली आहे. नियमित गाड्यांसह विशेष गाड्यांचे आरक्षण (Reservation) आधीच फूल झाल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. खाजगी बसचे दर गगनाला भिडलेले असल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना ते परवडत नाहीत. परिणामी, जनरल डब्यातून प्रवास करणे हा एकमेव पर्याय आता कोकणी माणसासमोर उरला आहे.
या भीषण गर्दीमुळे दादर, ठाणे आणि सीएसएमटी यांसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांना कमालीचा संघर्ष करावा लागत आहे. कोकण कन्या, मंगलोर आणि तुतारी एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांच्या जनरल डब्यात पाय ठेवण्यासाठी जागा मिळावी, म्हणून प्रवाशांना गाडी सुटण्यापूर्वी १२ ते १५ तास आधीच स्थानकावर रांगा लावाव्या लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहून जागा मिळवण्यासाठी ही जीवघेणी कसरत सुरू आहे.
या लांबच लांब रांगांचा आणि प्रवासाचा सर्वाधिक फटका महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. १५ तास रांगेत उभे राहिल्यानंतर पुन्हा पुढील १० ते १५ तासांचा गर्दीत करावा लागणारा प्रवास, असा एकूण २७ ते ३० तासांचा हा प्रवास प्रवाशांच्या पाचवीलाच पुजला आहे. यामध्ये रात्रीची झोप नाही आणि बसण्यासाठी हक्काची जागाही नाही, अशा स्थितीत चाकरमानी आपला प्रवास पूर्ण करत आहेत.
प्रवासादरम्यानच्या सुविधांची स्थिती तर अत्यंत भयावह आहे. प्रचंड उकाडा आणि गर्दीमुळे डब्यात साधे बाथरूमपर्यंत पोहोचणेही अशक्य होऊन बसते. रांगेत उभे असताना जेवणाखाण्याचे हाल होतात आणि प्रवासात पाण्याचा घोट घेण्यासाठीही कसरत करावी लागते. ‘नकोसा वाटणारा हा प्रवास’ केवळ गावाकडच्या ओढीपोटी कोकणी माणूस सहन करत आहे. मात्र, या गैरसोयींमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
इतकी भीषण परिस्थिती असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. ‘सोशिक कोकणी माणूस’ सर्व काही निमूटपणे सहन करतो, याचाच गैरफायदा घेतला जात असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. दरवर्षीची हीच परिस्थिती असूनही जनरल डब्यांची संख्या वाढवणे किंवा रांगांचे सुयोग्य नियोजन करणे यामध्ये रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याने, आता हे चाकरमान्यांचे दुःख नेमकं कोणाला दिसेल, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
याशिवाय यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे कोकण रेल्वे मार्गाचे कोकण रेल्वेच्या या कायमस्वरूपी समस्यांवर मात करण्यासाठी मार्गाचे दुहेरीकरण आणि भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गाड्यांची गर्दी पाहता, जोपर्यंत रेल्वे मार्गाचे पूर्णतः दुहेरीकरण होत नाही, तोपर्यंत गाड्यांचा वेग वाढवणे आणि नवीन फेऱ्या सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. तसेच, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेच्या मुख्य प्रवाहात विलिनीकरण झाल्यास निधीची उपलब्धता वाढून पायाभूत सुविधांचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो. मात्र, दुर्दैवाने या कळीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे कोकणचा रेल्वे प्रवास आजही ‘सिंगल ट्रॅक’वरच अडकून पडला आहे.


