सिंधुदुर्ग: सावंतवाडी तालुक्यातील भालावल परिसरात काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका जंगली हत्तीने जोरदार एन्ट्री करत भीतीचे वातावरण निर्माण केले. या हत्तीने गावात प्रवेश केल्यानंतर आपला मोर्चा थेट उभ्या असलेल्या गाड्यांकडे वळवला.
स्थानिक रहिवासी विकास गुयेकर यांच्या गाडीचे या हत्तीने प्रचंड नुकसान केले आहे. सुमारे अर्धा तास हा हत्ती गाडीसोबत खेळत होता; त्याने गाडी चहूबाजूंनी फिरवून अक्षरशः उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर हत्तीने आपला मोर्चा शेजारच्या बागांकडे वळवला. तिथे असलेल्या फणसाच्या झाडाला जोरात हलवून त्याने फणस पाडले आणि फस्त केले. एवढ्यावरच न थांबता, हत्ती पुन्हा परतला आणि त्याने तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या एका गाडीचीही तोडफोड केली.
हा हत्ती आकाराने मध्यम असला तरी तो एकटाच फिरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हत्तीचा नेमका ठावठिकाणा शोधण्यासाठी वनविभागाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने हवेतून हत्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा हत्ती तांबोळीच्या दिशेने गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Facebook Comments Box


