लोणावळा:१ मे २०२६ रोजी सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या ओघामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. रणरणत्या उन्हामुळे एकापाठोपाठ १० ते १२ वाहने नादुरुस्त (ब्रेकडाउन) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. या भीषण कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह हजारो प्रवाशांना बसला असून, नागरिक तब्बल ३ ते ४ तास एकाच जागी अडकून पडले होते. विशेषतः लोणावळा आणि खोपोली परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. कोंडीत अडकलेल्या सर्व वाहनांकडून टोल न घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच, या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प (Missing Link Project) तातडीने सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
वास्तविक हा प्रकल्प आज मध्यरात्रीनंतर लोकांसाठी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, घाटातील वाढती गर्दी आणि प्रवाशांचे हाल लक्षात घेता, उद्घाटन सोहळा संपताच हा मार्ग तात्काळ सुरू करण्यात आला आहे. या नवीन मार्गामुळे घाटातील प्रवासाचा वेळ वाचणार असून, रखडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या प्रशासनाकडून वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


