मालवण: मध्य प्रदेशातील जबलपूर येथे अलीकडेच घडलेल्या दुर्दैवी बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मालवण बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी होणाऱ्या प्रवासी होडी वाहतुकीवर प्रवासी क्षमतेच्या दृष्टीने कडक निर्बंध लादले होते. रविवारी सकाळी बंदर विभागाने अचानक प्रत्येक होडीतील प्रवाशांची संख्या निश्चित केल्यामुळे होडी व्यावसायिक आणि बंदर अधिकारी यांच्यात वादाची स्थिती निर्माण झाली. नियमानुसार पर्यटकांच्या सुरक्षेचे काटेकोर पालन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये या निर्णयामुळे संभ्रमाचे वातावरण पसरले आणि याचा परिणाम म्हणून काही काळ प्रवासी होडी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत होडी व्यावसायिकांनी आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. पर्यटकांच्या सुरक्षेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या होडी व्यावसायिकांची बाजू आमदार निलेश राणे यांनी प्रशासनासमोर मांडली. या सकारात्मक चर्चेनंतर अखेर तोडगा निघाला आणि बंद पडलेली किल्ले प्रवासी होडी वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत सुरू झाली. या निर्णयामुळे खोळंबलेल्या पर्यटकांसह व्यावसायिकांनीही समाधान व्यक्त केले असून, ‘शिवराजेश्वर किल्ला प्रवासी वाहतूक’ संस्थेच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार मानण्यात आले आहेत.


