मुंबई: भारतीय रेल्वेच्या ‘रोड टू रेल’ या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत सेंट्रल रेल्वेने इगतपुरी गुड्स शेडवर ऑटोमोबाईल लोडिंगची सुविधा यशस्वीपणे सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे मालवाहतुकीच्या क्षेत्रात रेल्वेने आपले पाऊल अधिक भक्कम केले असून, गती शक्ती मिशनला यातून मोठी चालना मिळणार आहे.
या उपक्रमाची पहिली मोठी ऑर्डर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून प्राप्त झाली असून, इगतपुरी (IGP) ते नौतनवा (NTV) या मार्गावर पहिल्या NMG रेकचे प्रस्थान झाले आहे. या रेकमध्ये एकूण २५ वॅगन्स असून त्यामध्ये १०० कार्स सुरक्षितपणे लोड करण्यात आल्या आहेत. या एका रेकच्या माध्यमातून रेल्वेला सुमारे १७.१६ लाख रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या सुविधेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन वाहनांची सुरक्षित, जलद आणि पर्यावरणस्नेही वाहतूक शक्य होणार आहे. सेंट्रल रेल्वेने या लोडिंग प्रक्रियेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले असून, यामध्ये कामगार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाहने वॅगनमध्ये लोड करताना दिसत आहेत. लॉजिस्टिक्स क्षेत्र अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Road To Rail: इगतपुरीहून आता रेल्वेने होणार कार्सची वाहतूक – Kokanai
सविस्तर बातमी👇 https://t.co/YLPxxXrNE7 pic.twitter.com/fbpJjEFBNu— Kokanai Digital News Channel (@kokanai21) May 3, 2026


