मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन ‘कनेक्टिंग लिंक’ (मिसिंग लिंक) प्रकल्पावर वाहतूक नियमांची माहिती सर्व वाहनचालकांना दिली आहे.
१३.३ किलोमीटर लांबीच्या या आठ पदरी मार्गावर केवळ कार आणि बसेसनाच प्रवेश देण्यात येणार आहे. ट्रक, अवजड वाहने, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारी वाहने तसेच ट्रेलर्स यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
१ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या नवीन मार्गामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. खंडाळा घाटातील धोकादायक वळणे टाळून हा मार्ग तयार करण्यात आला असून, त्यामुळे प्रवास वेळ २० ते ३० मिनिटांनी कमी होईल.
एमएसआरडीसीने सुरक्षित, वेगवान आणि शिस्तबद्ध वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी हे नियम लागू केले आहेत. सर्व वाहनचालकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे एमएसआरडीसीने आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


