मुंबई: पश्चिम रेल्वेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या थांब्यांबाबत सध्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील थांब्यांच्या संख्येतील तफावत पाहता, रेल्वे प्रशासन गुजरातवर अधिक मेहेरबान असल्याचे दिसून येते. २०९०१/०२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात झाली तेव्हा ती केवळ अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि मुंबई सेंट्रल अशा प्रमुख स्थानकांवर थांबत होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच गुजरातमध्ये या गाडीला आणंद, नवसारी, वलसाड आणि वापी असे अनेक थांबे देण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, मार्च २०२५ ते ऑगस्ट २०२५ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत गुजरातमध्ये तीन नवीन थांबे वाढवण्यात आले, ज्यामुळे या गाडीचा ‘सुपरफास्ट’ दर्जा केवळ नावापुरता उरला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रेल्वेच्या या निर्णयातील विसंगती अधिक स्पष्ट होते जेव्हा आपण दोन स्थानकांमधील अंतर पाहतो. गुजरातमध्ये सुरत ते नवसारी हे अंतर केवळ २९ किमी आणि वापी ते वलसाड हे अंतर फक्त २६ किमी असतानाही तेथे थांबे देण्यात आले आहेत. याउलट, महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर वापी ते बोरीवली या १४० किमीच्या प्रदीर्घ अंतरात मागणी होऊनही एकाही नवीन थांब्याचा विचार करण्यात आलेला नाही. पालघर किंवा विरार सारख्या महत्त्वाच्या स्थानकांकडे झालेले हे दुर्लक्ष अन्यायकारक असल्याची भावना मराठी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. एकाच रेल्वे मार्गावर एका राज्यासाठी नियमात शिथिलता आणि दुसऱ्या राज्यासाठी उपेक्षा, असा रेल्वेचा हा ‘दुजाभाव’ प्रवाशांच्या पचणी पडत नसल्याचे चित्र दिसत आहे.


