एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या दोन लोकल; मुंबईत मोठा अपघात थोडक्यात टळला

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वेच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे घडली. तांत्रिक चुकीमुळे एकाच ट्रॅकवर दोन लोकल गाड्या समोरासमोर आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सुमारे १३० मीटर अंतरावर गाडी थांबली आणि मोठा अनर्थ टळला.

​मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरकडून सीएसएमटीच्या दिशेने येणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर येणे अपेक्षित होते. मात्र, सिग्नलिंग यंत्रणेतील त्रुटी किंवा मानवी चुकीमुळे ही गाडी चुकीच्या पद्धतीने प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर वळवण्यात आली. विशेष म्हणजे, याच प्लॅटफॉर्मवर आधीच दुसरी एक लोकल उभी होती. जेव्हा बदलापूर लोकल प्लॅटफॉर्म ५ च्या ट्रॅकवर शिरली, तेव्हा मोटरमनच्या लक्षात आले की होम सिग्नल लाल आहे आणि समोर दुसरी गाडी उभी आहे. त्याने त्वरित आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवली, ज्यामुळे दोन्ही गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर राहिले.

​या घटनेनंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म ५ ते ८ पर्यंतची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आणि दोन्ही गाड्या सुरक्षितरीत्या मागे घेण्यात आल्या. या गोंधळामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु सध्या सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सीएसएमटी परिसरातच एक दिवसापूर्वी डिरेलमेंटची (रुळावरून डबा उतरणे) घटना घडली होती, त्यापाठोपाठ हा प्रकार घडल्याने रेल्वेच्या सिग्नलिंग यंत्रणेवर टीका होत आहे. रेल्वे प्रशासनाने या ‘रॉग रुटिंग’ प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search