मुंबई:राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल होण्यास सुरुवात झाली असून, १ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण भागातही काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. या बदलांमुळे मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होणार असली, तरी पूर्व विदर्भासह विदर्भातील काही भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही. मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झालेला नसल्यामुळे, सद्यस्थितीनुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागांत किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संभाव्य वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी मान्सूनच्या आगमनापूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये पेरणीची घाई करू नये, असा स्पष्ट सल्ला प्रशासनाने दिला आहे.
तसेच, विजेच्या कडकडाटासह पाऊस होत असताना नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या व आपल्या पाळीव जनावरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. वीज पडण्याच्या घटना टाळण्यासाठी अशा वेळी कोणीही झाडाखाली, टिनशेडखाली, विद्युत ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


