मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मेट्रो १३ या नव्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मीरा-भाईंदर ते वसई-विरार दरम्यान धावणारा हा सुमारे २५.०३ किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी मार्ग ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना थेट जोडणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १७,७२४.९९ कोटी रुपये असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (MMRDA) याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या नव्या मार्गावर एकूण १६ स्थानके (१३ उन्नत आणि ३ भूमिगत) प्रस्तावित असून, हा मार्ग मीरा रोड, नायगाव, वसई, नालासोपारा आणि विरार या भागांना जोडणार आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वसई खाडीवर पांजू बेटाला जोडणारा ४.९२ किलोमीटर लांबीचा डबल डेकर पूल असणार आहे, ज्यावर खाली ६ पदरी रस्ता आणि वर मेट्रो धावणार आहे. तसेच चिखल डोंगरी येथे मेट्रो डेपो उभारण्यात येणार असून, नायगाव, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकांसह मेट्रो मार्ग ९ शी सुलभ जोडणी दिली जाईल.
भूसंपादन आणि पोहोच रस्ते तयार करण्याचे काम पुढील ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, मंजुरी मिळाल्यापासून ५ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मेट्रोमुळे प्रवाशांचा वेळ ५० टक्क्यांनी वाचणार असून, २०३१ पर्यंत दररोज सुमारे ४.४९ लाख प्रवासी यावरून प्रवास करतील असा अंदाज आहे. परिणामी, महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास आणि प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.


