ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा ‘मुहूर्त’ हुकला; १ मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा

   Follow us on        

ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असतानाच, प्रशासनाच्या संथ कार्यपद्धतीमुळे आता संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित बांधकामांवर हातोडा पडत नसल्याने, “सरकारी बाबू नेमके कोणावर मेहरबान आहेत?” असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. या दिरंगाईच्या निषेधार्थ आता थेट १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या काजुवाडी, दत्त मंदिर परिसर आणि नाचरे चाळ येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाढीव बांधकामे झाली आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने ७ एप्रिल २०२६ रोजी संबंधित व्यक्ती, श्री. महेश रमेश बागवे यांना नोटीस बजावली होती. २४ तासांच्या आत हे बांधकाम स्वतःहून हटवावे, अन्यथा महापालिका कारवाई करेल असे त्यात स्पष्ट नमूद होते. मात्र, या नोटिशीला दोन आठवडे उलटूनही पालिकेचा एकही कर्मचारी कारवाईसाठी फिरकला नसल्याने ही नोटीस केवळ कागदी घोडा ठरली आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.

​मंत्रालयाचे आदेशही धाब्यावर?

विशेष म्हणजे, या अनधिकृत बांधकामाविरोधात केवळ पालिकेतच नव्हे, तर थेट मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही दाद मागण्यात आली होती. उपमुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले होते. १६ मार्च २०२४ पासून यासंदर्भात लेखी पाठपुरावा सुरू असूनही, वरिष्ठ स्तरावरील आदेशांना स्थानिक प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

​१ मे पासून बेमुदत उपोषण

प्रशासकीय दिरंगाई आणि अनधिकृत बांधकामांना मिळणारे कथित अभय यांविरोधात तक्रारदार श्री. सुरेश जिमन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर ते बेमुदत शांततापूर्ण उपोषणाला बसणार आहेत.

​पालिकेत धाकधूक वाढली

या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाची डोकेदुखी वाढली आहे. उपोषणादरम्यान जर उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्यास संपूर्णपणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात ठणकावून सांगण्यात आले आहे. आता १ मे पूर्वी महापालिका प्रशासन आपली ‘मेहरबानी’ सोडून कारवाई करणार की उपोषणाची नामुष्की ओढवून घेणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search