भोजपूर:’एलटीटी पाटणा एक्सप्रेस’ (LTT Patna Express) मधून विंध्याचल (मिर्झापूर, उत्तर प्रदेश) ते आरा (भोजपूर, बिहार) असा प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांना कन्फर्म तिकीट असूनही संपूर्ण प्रवास उभे राहून करावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रवासी ट्रेनमध्ये चढले तेव्हा त्यांच्या आरक्षित जागांवर आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी ताबा मिळवला होता.
प्रवाशांनी याविरोधात रेल्वे हेल्पलाईन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (रेल्वे सेवा आणि रेल्वे मंत्रालय) वर तक्रार नोंदवली. त्यांना एसएमएसद्वारे तक्रार क्रमांक मिळाला, परंतु प्रवासादरम्यान कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही. पुढे बक्सर स्थानकावर तिकीट तपासनीस (TTE) आल्यावर प्रवाशांनी हा मुद्दा पुन्हा मांडला, परंतु गर्दीचे कारण सांगून त्यांना ‘मॅनेज’ करण्याचा सल्ला देण्यात आला. या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांना तीव्र मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले.
या प्रकरणी ‘भोजपूर ग्राहक विवाद निवारण आयोगाने’ (Bhojpur Consumer Disputes Redressal Commission) रेल्वे प्रशासनाला मोठा दणका दिला आहे. कृष्णा प्रताप सिंह (अध्यक्ष) आणि कमल किशोर सिंह (सदस्य) यांच्या खंडपीठाने प्रवाशांचे तिकीट, तक्रार नोंदी, मेसेज आणि छायाचित्रे तपासून रेल्वेला दोषी ठरवले.
आयोगाने रेल्वेला तिकीट दराच्या अंदाजे १० पट म्हणजेच २०,००० रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, तिकिटाची मूळ रक्कम १,८७६.८० रुपये वार्षिक ८% व्याजासह परत करण्याचे आणि कायदेशीर खर्चासाठी १५,००० रुपये ६० दिवसांच्या आत देण्याचे निर्देश दिले आहेत. जर रेल्वेने ही रक्कम वेळेत दिली नाही, तर प्रवाशांना वार्षिक १०% व्याजासह ती वसूल करण्याचा अधिकार असेल. दरम्यान, रेल्वेने हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगत हा भाग रेल्वे पोलिसांच्या (GRP) अखत्यारीत येत असल्याचा युक्तिवाद केला होता, जो आयोगाने फेटाळून लावला.


