मुंबई: मध्य रेल्वेने उत्तर भारतातील विशेष रेल्वे गाड्या नियमित करण्याचा सपाटा लावला असून, याच मालिकेत आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते रिवा’ या साप्ताहिक एक्स्प्रेसचा समावेश झाला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०१५३/२०१५४ रिवा-सीएसएमटी-रिवा ही गाडी आता नियमित स्वरूपात धावणार आहे. ही गाडी दर गुरुवारी रिवा येथून दुपारी १५:५० वाजता सुटेल, तर दर शुक्रवारी सीएसएमटी येथून दुपारी १३:३० वाजता सुटेल. या निर्णयामुळे उत्तर भारतीयांना दिलासा मिळाला असला तरी, महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मध्य रेल्वेच्या दुटप्पी धोरणामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उपनगरीय लोकल गाड्यांच्या वाहतुकीत अडथळा नको, असे तांत्रिक कारण पुढे करून दादर-रत्नागिरी सारख्या महत्त्वाच्या राज्यातील गाड्या बंद पाडणाऱ्या रेल्वे प्रशासनाने, आता परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मात्र मुंबईतील मुख्य टर्मिनसवरून सोडण्याचा सपाटा लावला आहे. यावरून मध्य रेल्वेचा महाराष्ट्रातील प्रवाशांप्रती असलेला दुजाभाव स्पष्टपणे समोर येत आहे.
काही काळापूर्वी दादर-रत्नागिरी पॅसेंजरसारख्या गाड्या केवळ मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांना अडथळा हे कारण देऊन बंद करण्यात आल्या. मात्र, दुसरीकडे दादर-गोरखपूर, मुंबई-बेंगळुरू वंदे भारत आणि आता नव्याने नियमित करण्यात आलेली ‘रिवा एक्स्प्रेस’ यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना दादर आणि सीएसएमटीसारख्या गजबजलेल्या स्थानकांवरून हिरवा कंदील दाखवला जात आहे. “राज्यातील प्रवाशांना वाऱ्यावर सोडून परराज्यातील गाड्यांना झुकते माप देणे हे नेमके कोणते रेल्वे प्रशासन?” असा संतप्त सवाल आता प्रवासी संघटना विचारत आहेत.
रेल्वे मंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली?
विशेष म्हणजे, दादर-रत्नागिरी गाडी पुन्हा दादरपर्यंत सुरू करण्याच्या व्यवहार्यतेची (Feasibility) तपासणी करण्याचे आदेश खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिले होते. परंतु, अनेक दिवस उलटूनही मध्य रेल्वेने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा निर्णय जाहीर केलेला नाही. रेल्वे मंत्र्यांच्या सूचनेनंतरही टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा हा ‘मुजोरपणा’ असल्याचे बोलले जात आहे.
कोकण आणि राज्यातील इतर भागांतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असताना, रेल्वेचे अधिकारी मात्र सोयीस्करपणे तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत आहेत. एका बाजूला राज्यातील रेल्वेगाड्यांच्या वेळेचा बोजवारा उडाला असताना, दुसऱ्या राज्यांसाठी मुंबईची मुख्य स्थानके रिकामी कशी होतात, असा सवाल उपस्थित करत आता रेल्वे प्रवासी आक्रमक झाले आहेत. या मुजोर प्रशासनाविरोधात आता दादर येथे होणाऱ्या रेल्वे परिषदेत मोठे आंदोलन पुकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


