बेळगाव:कर्नाटक सरकारने १० वीचा (SSLC) निकाल जाहीर करताना पुन्हा एकदा आपला मराठी द्वेष दाखवून दिला आहे. मंगळवारी, २३ एप्रिल रोजी कर्नाटक एसएसएलसी परीक्षा २०२४ चा निकाल घोषित करण्यात आला. मात्र, निकालाच्या अधिकृत संकेतस्थळावर विषयांच्या रकान्यात ‘मराठी’ या शब्दाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन पोर्टलवर जिथे मराठी विषयाचे नाव असायला हवे होते, तिथे फक्त ‘रिकामी जागा’ सोडण्यात आली होती, तर इतर सर्व भाषांच्या विषयांची नावे त्यांच्या गुणांसमोर स्पष्टपणे दिसत होती.
सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी ही बाब अत्यंत क्लेशदायक ठरली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील नेत्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, यामागे मराठी भाषा संपवण्याचा कर्नाटक सरकारचा ‘छुपा अजेंडा’ असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सीमाभागातील ८६५ गावांमध्ये अनेक वर्षांपासून मराठी भाषेवर गदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि निकालासारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजातून ‘मराठी’ शब्द वगळणे हा त्याच षडयंत्राचा भाग असल्याचे मानले जात आहे.
या संतापजनक प्रकारावर बोलताना सीमाभागातील नेते शुभम शेळके यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “निकालातून मराठी शब्द वगळणे ही बाब सहन करण्यापलीकडची आहे. सीमाभागातील मराठी अस्मिता पुसून टाकण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असून, आम्ही याविरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे सीमाभागात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.


