ठाणे: ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सातिस ब्रिजवर आज गुरुवारी दुपारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एका शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही बस स्वारगेटहून वसईच्या दिशेने जात असताना दुपारी १:२८ वाजण्याच्या सुमारास अचानक इंजिनमधून धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवल्यामुळे बसमधील १४ प्रवासी आणि २ कर्मचारी अशा एकूण १६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आगीची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी २:३० वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली. मात्र, या भीषण आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे सातिस ब्रिजवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस आणि एमएसआरटीसी प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


