Mumbai Goa Highway: मुंबई -गोवा महामार्गाच्या कामात आता कोकण रेल्वेचा ‘अडथळा’

   Follow us on        

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाचे काम कोकण रेल्वेच्या तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा एकदा रखडले असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली ३१ मेची डेडलाईन पूर्ण होणे आता कठीण दिसत आहे. विशेषतः माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामात कोकण रेल्वेचे विद्युत खांब मुख्य अडथळा ठरत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी हा मार्ग पूर्ण होण्याच्या आशेवर असलेल्या कोकणवासीयांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाच्या कामासाठी आतापर्यंत तीन ठेकेदार बदलण्यात आले आहेत. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, तांत्रिक पेच सुटत नसल्याने प्रगती खुंटली आहे. माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुले होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामात विजेचे खांब आडवे येत असल्याने या भागातील काम पूर्णपणे थांबले आहे.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रखडलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. या भेटीनंतर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत एक संयुक्त बैठकही पार पडली. या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अडथळा ठरणारे विद्युत खांब हटवण्यास मान्यता दिली असली, तरी प्रत्यक्षात या कामात मोठी चालढकल होत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा हा प्रकल्प आता थट्टेचा विषय बनला आहे. २०११ मध्ये सुरू झालेल्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे आणि २०१४ पासून सुरू असलेल्या इंदापूर ते झारप या दुसऱ्या टप्प्याचे काम तब्बल १४ वर्षे उलटूनही पूर्ण झालेले नाही. या विलंबाबद्दल कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून वारंवार तारखा दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात काम पूर्ण होताना दिसत नाही.

सध्या नागोठणे आणि कोलाड परिसरातील पुलांचे बांधकामही अत्यंत संथ गतीने सुरू आहे, ज्यामुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक, नोकरदार आणि पर्यटकांना बसत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना जर हे बायपास आणि उड्डाणपूल खुले झाले नाहीत, तर प्रवाशांना पुन्हा एकदा खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या भीषण संकटाचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search