पुणे: महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून, २९ मे २०२६ पासून नियमित फेरी-०१ अंतर्गत प्रवेश निश्चितीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी देखील याच दिवशी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने एक महत्त्वाचा दिलासा दिला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करताना इयत्ता १० वी उत्तीर्ण मूळ गुणपत्रक (Marksheet) आणि शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) सादर करणे सध्या अनिवार्य असणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भातील परिपत्रक शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) प्रसिद्ध केले असून, त्यावर शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
राज्य मंडळाचा इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाला असला, तरी कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेश फेऱ्या सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मूळ गुणपत्रकांचे वाटप करण्यात आलेले नाही. दस्तऐवज हातात नसल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश प्रक्रियेत अडथळा येऊ नये, म्हणून शिक्षण विभागाने हा मध्यवर्ती मार्ग काढला आहे. पहिल्या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मूळ कागदपत्रांऐवजी तात्पुरती सवलत देण्यात आली आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात एक लेखी हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये ‘बोर्डाकडून मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झाल्यानंतर तो महाविद्यालयात वेळेत सादर केला जाईल’ असे नमूद करावे लागेल. मात्र, दिलेल्या मुदतीत ही कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश रद्द केला जाईल, याची स्पष्ट जाणीव कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना करून द्यावी, अशा सूचना राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत.


