ठाणे: ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करी विरोधात एक मोठी कारवाई केली आहे. एका कंटेनरमधून छुप्या पद्धतीने नेला जाणारा तब्बल १ कोटी ६५ लाख रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष म्हणजे, हा मद्यसाठा नेण्यासाठी तस्करांनी बनावट औषध वाहतुकीचे चलन (Bill) तयार केले होते, जेणेकरून प्रशासनाची दिशाभूल करता येईल. मात्र, उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून हा कंटेनर पकडला आणि त्यातील साठा ताब्यात घेतला.
या कारवाईबाबत अधिक माहिती देताना ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सांगितले की, हा मद्यसाठा नेमका कुठून आला आणि तो कोणाला वितरित केला जाणार होता, याचा तपास सध्या सुरू आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. गेल्या दीड वर्षात ठाणे उत्पादन शुल्क विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत आतापर्यंत १५ कोटी रुपयांहून अधिक किमतीची अवैध दारू जप्त केली आहे. राज्यात सध्या एकीकडे इंधनाचा तुटवडा आणि अवैध सिलिंडरवर कारवाया सुरू असतानाच, दारू तस्करीचा हा मोठा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.


