राजापूर:
राजापूर तालुक्यातील पांगरे येथे शनिवारी एक धक्कादायक घटना घडली असून, एका भीषण अपघातातून पुण्याच्या सात भाविकांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. दर्शनासाठी आलेल्या या भाविकांची चारचाकी गाडी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळण्याच्या बेतात असतानाच, दरीच्या कडेला असलेल्या दाट झुडपे आणि रानवेलींच्या आधारामुळे गाडी तिथेच अडकली आणि एक मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील काही भाविक पांगरे येथील स्वामी शिवानंद टेबे महाराज मठात दर्शनासाठी आले होते. मठात दर्शन घेऊन आणि समाधीस्थळाला भेट दिल्यानंतर, सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास हे सर्व भाविक आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले. यावेळी पांगरे पुलाजवळ उभी असलेली त्यांची चारचाकी गाडी सुरू करत असताना, हँडब्रेक योग्यरीतीने लावलेला नसल्याने वाहन अचानक पाठीमागे सरकू लागले. वाहनाच्या अगदी मागेच खोल दरी असल्याने अवघ्या काही क्षणांतच गाडी दरीच्या दिशेने घसरली आणि तिचा मोठा भाग दरीकडे झुकला. मात्र, सुदैवाने दरीच्या कडेला असलेल्या दाट झुडपांमध्ये आणि रानवेलींमध्ये गाडी अडकून राहिल्याने ती खाली कोसळली नाही.
या घटनेच्या वेळी वाहनामध्ये एकूण सात जण प्रवास करत होते. गाडी दरीच्या दिशेने घसरत असल्याचे लक्षात येताच, सर्वांनी अत्यंत प्रसंगावधान राखले आणि तातडीने पुढील पाठीमागच्या दारांतून बाहेर पडून स्वतःचे प्राण वाचवले. वाहनातून सुरक्षित बाहेर आल्यानंतर गाडीची ती धोकादायक स्थिती पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. जर काही इंचांचाही फरक पडला असता, तर वाहन थेट ५० फूट खोल दरीत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. सुदैवाने सर्व भाविक सुखरूप बचावल्याने उपस्थित सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला आणि समाधान व्यक्त केले.


