मुंबई: कोकणच्या समृद्ध संस्कृतीचे आणि लोकजीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या पारंपरिक दशावतार लोककलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. या कलेला आणि कलाकारांना सर्वतोपरी राजाश्रय दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी दिली. दशावतार नाट्यमंडळांच्या विविध मागण्या शासनस्तरावरील वेगवेगळ्या विभागांशी संबंधित असल्याने, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर विशेष समन्वय बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. कोकणच्या या वैभवशाली लोककलेच्या रक्षणासाठी आणि कलाकारांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यासाठी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध दशावतार मंडळांचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणची ही वैशिष्ट्यपूर्ण कला एका प्रांतापुरती मर्यादित न राहता ती व्यापक स्तरावर पोहोचावी, यासाठी कोकणातील दशावतार महोत्सवांची संख्या वाढवली जाईलच, पण त्याचसोबत मुंबई आणि ठाणे या महानगरांमध्येही शासनाच्या वतीने विशेष दशावतार महोत्सवांचे भव्य आयोजन करण्यात येईल, अशी माहिती शेलार यांनी दिली. ही कला नव्या पिढीपर्यंत सक्षमपणे पोहोचावी यासाठी प्रभावी प्रशिक्षण कार्यशाळा राबवताना स्थानिक संस्थांशी समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच महाराष्ट्राच्या मातीतील या लोककलांची ओळख शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने राज्याच्या लोककलांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याबाबत ‘बालभारती’ला तातडीने पत्र पाठविण्याचे निर्देश मंत्र्यांनी यावेळी दिले. याशिवाय, कलाकारांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी परिवहन विभागाकडे विशेष पाठपुरावा केला जाणार आहे.
पात्र दशावतार कला पथकांना शासनाकडून आर्थिक अनुदान दिले जाते आणि ज्येष्ठ कलावंतांना मानधन योजनेअंतर्गत दरमहा पाच हजार रुपयांचे मानधनही उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगत मंत्री शेलार यांनी कलाकारांच्या इतर मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वस्त केले. यामध्ये कलाकारांच्या वाहनांना करसवलत मिळणे, त्यांच्यासाठी विश्रांतीगृहे, मुंबई-ठाणे परिसरात आल्यास तात्पुरती निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत दशावतार कलाकारांसाठी हक्काचे ‘सांस्कृतिक भवन’ उभारण्याच्या मागण्यांचा समावेश आहे. दशावतार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कलाकारांची आणि मंडळांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी एका अधिकृत निर्देशिकेच्या (डिरेक्टरी) प्रस्तावालाही मंत्री शेलार यांनी बैठकीत मान्यता दिली. दशावतार ही कला आपली सांस्कृतिक अस्मिता आहे आणि कलाकारांना सन्मानाचे जीवन देण्यासाठी शासन खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


