सावंतवाडी:अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात उद्भवलेल्या तीव्र युद्धजन्य परिस्थितीचे थेट पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या इंधनाच्या मोठ्या तुटवड्यामुळे सावंतवाडी शहरात पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासकीय स्तर आणि पेट्रोल पंप चालकांकडून इंधनाची मोठी काटकसर सुरू करण्यात आली असून, वाहनधारकांना मर्यादित स्वरूपातच इंधन पुरवले जात आहे.
दुचाकींना २०० तर चारचाकींना फक्त १००० रुपयांचे पेट्रोल!
अचानक लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार, आता सावंतवाडीतील पेट्रोल पंपांवर दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त २०० रुपये, तर चारचाकी वाहनांना केवळ १००० रुपये किमतीचेच पेट्रोल दिले जात आहे. या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे आणि प्रशासनाच्या निर्बंधांमुळे वाहनधारकांमध्ये कमालीचा गोंधळ आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने देशात महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चालला असून, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आधीच उच्चांक गाठला आहे.
पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन
देशातील या गंभीर परिस्थितीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना इंधन आणि एलपीजी गॅसचा वापर अत्यंत जपून व काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे सातत्याने होणारी दरवाढ आणि दुसरीकडे आता सुरू झालेली ही इंधन कपात, या दुहेरी संकटामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार आणि व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. हा इंधनाचा तुटवडा पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


