नवी दिल्ली: कधीकाळी रेल्वे तंत्रज्ञानासाठी जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इंग्लंडसारख्या परदेशांवर अवलंबून असलेला भारत आता जागतिक रेल्वे बाजारपेठेत एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. भारताची स्वदेशी बनावटीची आणि सेमी-हाय-स्पीड ट्रेन ‘वंदे भारत’ आता लवकरच परदेशी रेल्वे मार्गांवर धावताना दिसणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी अभियांत्रिकी सल्लागार कंपनी ‘राईट्स लिमिटेड’ (RITES) केंद्र सरकारसोबत मिळून वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीसाठी एक विशेष रोडमॅप तयार करत आहे. या माध्यमातून भारत रेल्वे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीन आणि जपानसारख्या बलाढ्य देशांना थेट टक्कर देणार आहे.
सध्या भारतात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन्स या प्रामुख्याने ‘ब्रॉड-गेज’ (Broad-Gauge) ट्रॅकवर चालतात. परंतु, परदेशांमधील रेल्वे नेटवर्क हे बहुतांश करून ‘स्टँडर्ड-गेज’ (Standard-Gauge) ट्रॅकवर आधारित असते. म्हणूनच जागतिक बाजारपेठेची ही गरज ओळखून, राईट्स लिमिटेड आणि भारतीय रेल्वे सध्या स्टँडर्ड-गेजवर चालणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे डिझाइन विकसित करण्याचे काम वेगाने करत आहेत. या नव्या डिझाइनमुळे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी खर्चात आधुनिक आणि जागतिक दर्जाची रेल्वे उत्पादने पुरवणारा देश म्हणून आपली ओळख निर्माण करता येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सुरुवातीला भारताचे शेजारील देश जसे की बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ यांनी वंदे भारत ट्रेन खरेदी करण्यात मोठी उत्सुकता दर्शवली आहे. याव्यतिरिक्त, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील काही देशांनीही या ट्रेनच्या खरेदीसाठी रस दाखवला आहे, जिथे राईट्स कंपनीचे आधीपासूनच रेल्वे ऑपरेशन्स सुरू आहेत. मेक इन इंडिया मोहिमेचा हा एक मोठा टप्पा मानला जात असून, ही योजना यशस्वी झाल्यास आगामी काळात परदेशी रेल्वे मार्गांवर ‘मेड इन इंडिया’ वंदे भारत ट्रेन दिमाखात धावताना पाहायला मिळेल.


