मुंबई:
देशातील विमानतळ पायाभूत सुविधांना जागतिक दर्जा देण्यासाठी ‘अदानी एअरपोर्ट सिटी लिमिटेड’ने (अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडची उपकंपनी) एका भव्य प्रकल्पाची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील ६ प्रमुख विमानतळांवर तब्बल ६५५ एकर जागेत एकात्मिक ‘एअरपोर्ट सिटी’ (विमानतळ शहरे) विकसित केली जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. हे प्रकल्प केवळ विमानतळापुरते मर्यादित नसून, ते शहरे, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी थेट जोडले जातील. या परिसराची रचना अशा पद्धतीने केली जात आहे, जिथे पर्यटक, व्यावसायिक आणि स्थानिक रहिवाशांना एकाच ठिकाणी सर्व सोयीसुविधा मिळतील.
या प्रकल्पाची व्याप्ती महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि आसाम अशा ५ राज्यांत असणार असून, यात मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, जयपूर आणि गुवाहाटी या ६ विमानतळांचा समावेश आहे. एकूण २२ दशलक्ष चौरस फूट जागेत हा विकास केला जाईल. विशेष म्हणजे, या नियोजित गुंतवणुकीतील सुमारे ७० टक्के रक्कम (४४० एकर जागा) केवळ मुंबई आणि नवी मुंबईतील प्रकल्पांसाठी खर्च केली जाणार आहे. या एअरपोर्ट सिटीज सिंगापूरचे चांगी, दुबई, ॲमस्टरडॅम आणि सोल यांसारख्या जागतिक दर्जाच्या विमानतळ शहरांच्या धर्तीवर विकसित केल्या जाणार आहेत.
आलिशान हॉटेल्स आणि जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा
या ‘एअरपोर्ट सिटी’मध्ये अत्याधुनिक कार्यालये, रिटेल मॉल्स, खाण्यापिण्याची ठिकाणे, मनोरंजन केंद्रे आणि कन्व्हेन्शन सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून, अदानी समूहाने ‘आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’सोबत पाच लक्झरी हॉटेल्ससाठी करार केला आहे. या करारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला ‘किम्पटन’ हा हॉस्पिटॅलिटी ब्रँड भारतात पहिल्यांदाच पदार्पण करत आहे. पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देत, या सर्व प्रकल्पांना अमेरिकेच्या ‘यू.एस. ग्रीन बिल्डिंग काउन्सिल’ कडून ‘लीड’ (LEED) गोल्ड प्री-सर्टिफिकेशन मिळाले आहे. यावर बोलताना अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचे संचालक जीत अदानी यांनी सांगितले की, भारताची विमान वाहतूक बाजारपेठ विस्तारत असताना, विमानतळांना केवळ वाहतुकीपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना गुंतवणूक आणि रोजगाराचे मोठे केंद्र बनवण्याचा कंपनीचा मानस आहे.
Photo Credit – Google


