Konkan Railway: कोकण रेल्वेत २३ लाख रुपयांचा गैरव्यवहार; प्रकरण न्यायालयात

   Follow us on        

मडगाव:

मडगाव आणि वेर्णा येथील कोकण रेल्वेच्या रनिंग रूमच्या देखभालीच्या कामात सुमारे २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने कोकण रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांसह दोन कंत्राटदारांविरुद्ध दक्षिण गोव्याच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये मडगाव विभागाचे तत्कालीन वरिष्ठ प्रादेशिक यांत्रिक अभियंता मंजनाथ क्षेत्रपाल, तत्कालीन मुख्य लोको निरीक्षक गोर्धनलाल बलई आणि कंत्राटदार एम. के. बेलवाडी व उदय के. बेलवाडी यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.

​दक्षिण गोवा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी २९ जून २०२६ रोजी या प्रकरणातील काही आरोपांमध्ये अंशतः बदल करण्यास परवानगी दिली. त्यानंतर सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे आणि खोटी कागदपत्रे वापरणे अशा विविध कलमांखाली हे आरोपपत्र सादर केले आहे.

​सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, जून २०१८ ते जून २०१९ या कालावधीत मडगाव आणि वेर्णा येथील रनिंग रूमच्या देखभालीसाठी सादर करण्यात आलेल्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली. कंत्राटदारांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) संदर्भातील बनावट कागदपत्रे जोडून खर्च फुगवून दाखवला होता. तपासात असे समोर आले आहे की, प्रत्यक्षात कामावर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन, ईपीएफ आणि ईएसआयसी योगदानाचा खोटा खर्च दाखवून सुमारे २३ लाख रुपयांचा आर्थिक लाभ उठवण्यात आला. या गैरव्यवहारामुळे कोकण रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी विशेष न्यायालयात होणार आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search