खाद्यपदार्थांत सोन्याची भुकटी मिसळून तस्करी! मुंबई विमानतळावर १५ कोटींचं सोने जप्त

   Follow us on        

​मुंबई:

एखाद्या अन्नपदार्थाच्या पाकिटात खाण्याच्या वस्तूऐवजी चक्क करोडो रुपयांचं सोनं लपवलं असेल, अशी कल्पनाही कुणी केली नसेल! पण तस्करांचा हा अजब आणि चाणाक्ष प्लॅन मुंबई विमानतळावर धुळीस मिळाला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी आणि चक्रावून टाकणारी कारवाई करत तब्बल साडेनऊ किलो सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.

दुबईहून आलेल्या तीन भारतीय प्रवाशांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची कसून तपासणी केली असता तस्करांच्या या नव्या आणि धक्कादायक कल्पकतेचा पर्दाफाश झाला. प्रवाशांनी सोन्याची बारीक भुकटी (Gold Powder) तयार केली होती आणि ती हुबेहूब तशाच रंगाच्या अन्नपदार्थांमध्ये मिसळली होती. अन्नपदार्थांची पाकिटे तशीच बंद करून ते अत्यंत हुशारीने भारतात आणण्याचा प्रयत्न करत होते.

​साडे ३३ किलोचे पाकीट जप्त

अन्नपदार्थांच्या नावाखाली चाललेल्या या सोन्याच्या तस्करीचा शोध घेताना DRI च्या अधिकाऱ्यांना या प्रवाशांकडे सोन्याची भुकटी मिसळलेले तब्बल साडे ३३ किलो वजनाचे अन्नपदार्थ आढळून आले. अन्नपदार्थांच्या पाकिटांचे वजन आणि त्यातील सोन्याची भुकटी वेगळी केल्यानंतर त्यातून तब्बल साडेनऊ किलो शुद्ध सोनं निष्पन्न झालं.

​तस्करांचा हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि नवनवीन क्लृप्त्या शोधणारा कट DRI च्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून तिन्ही प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय तस्करांची मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तवली जात असून DRI याप्रकरणी पुढील सखोल तपास करत आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search