नवी मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने सावंतवाडी रोड ते पनवेल दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) अंतर्गत एकूण ४ फेऱ्या पूर्ण करेल.
गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग:
गाडी क्रमांक ०१००८ सावंतवाडी रोड – पनवेल स्पेशल दर शनिवारी सकाळी ०७:२० वाजता सावंतवाडीहून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:०० वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०१००७ पनवेल – सावंतवाडी स्पेशल दर शनिवारी संध्याकाळी १८:१० वाजता पनवेलहून सुटेल आणि रविवारी पहाटे ०४:३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. प्रवासादरम्यान ही ट्रेन कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबेल.
ही ट्रेन १६ मे २०२६ ते ०६ जून २०२६ या कालावधीत धावणार असून दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ४ फेऱ्या होतील. या गाडीला एकूण २० एलएचबी (LHB) कोच असतील, ज्यामध्ये वातानुकूलित (AC) आणि शयनयान (Sleeper) डब्यांचा समावेश आहे. ही ट्रेन पूर्णपणे विजेवर चालणारी (Electric Traction) असेल. कोकण रेल्वेने प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, स्थानकांवर या संदर्भात फलक आणि उद्घोषणांद्वारे माहिती दिली जाणार आहे.


