Konkan Railway: जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये कुजकी फळे विकण्याचा प्रकार; विक्रेत्यावर कारवाई

   Follow us on        

रत्नागिरी:

मागील आठवड्यात प्रवाशांना खराब कलिंगडापासून बनवलेले फ्रूट सॅलड विकण्याचा प्रकार कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एका गाडीत झाला होता. या प्रकारामुळे रेल्वे गाड्यांतून विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थाच्या दर्जाबाबत प्रवाशांकडून प्रश्न निर्माण झाले होते. या प्रकारांनंतर रेल्वे प्रशासनाने अनधिकृत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी १५ दिवसांची एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत कालच प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एका अनधिकृत विक्रेत्यावर कोकण रेल्वेने कठोर कारवाई केली आहे.

मडगाव-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये कुजलेली फळे विक्रीसाठी ठेवून प्रवाशांची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वे प्रशासनाने दंड ठोठावला आहे. या व्यक्तीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) ताब्यात देण्यात आले आहे.

​नियमित तपासणीदरम्यान गैरप्रकार उघडकीस

​ही कारवाई ३१ मे रोजी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली. रेल्वेच्या नियमित तपासणीदरम्यान संबंधित व्यक्ती कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय रेल्वे डब्यांमध्ये फळांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. अधिक तपासणी केली असता, विक्रीसाठी ठेवलेल्या फळांचा दर्जा अत्यंत खराब असून ती कुजलेली असल्याचे आढळले. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता संबंधित व्यक्तीकडे कोणताही वैध परवाना किंवा ओळखपत्र नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर रेल्वे नियमांनुसार त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि पुढील तपासासाठी त्याला रत्नागिरी येथील आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले.

​१५ दिवसांची विशेष तपासणी मोहीम सुरू

​दरम्यान, प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा मिळावी यासाठी कोकण रेल्वेने ३१ मेपासून १५ दिवसांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. वाणिज्य विभाग आणि आरपीएफच्या संयुक्त पथकांकडून रेल्वे स्थानकांवर तसेच धावत्या गाड्यांमध्ये ही धडक तपासणी केली जात आहे.

​या विशेष मोहिमेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

​अनधिकृत विक्री आणि फेरीवाल्यांना आळा घालणे.

​खाद्यपदार्थांसाठी होणारी अवाजवी दर आकारणी रोखणे.

​निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि इतर गैरप्रकारांवर कायदेशीर कारवाई करणे.

​रेल्वेमधील स्वच्छता व प्रवासी सेवांचा दर्जा कायम राखणे.

​रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन:

कोकण रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गाड्यांमध्ये किंवा स्थानकांवर अनधिकृत विक्रेते अथवा कोणताही गैरप्रकार आढळल्यास प्रवाशांनी तातडीने रेल्वे प्रशासन किंवा आरपीएफकडे आपली तक्रार नोंदवावी.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search