राजापूर आगाराच्या ताफ्यात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल

   Follow us on        

राजापूर:

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांचा प्रवास अधिक सुकर व आरामदायी करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम व नवीन योजना राबविल्या जात आहेत. एस.टी. ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी महामंडळाने यापूर्वी ताफ्यात ‘लालपरी’ आणली होती आणि आता नवीन ‘राजमाता जिजाऊ’ एस.टी. बस महामंडळाच्या सेवेत दाखल केल्या आहेत. रत्नागिरी विभागीय कार्यालयाकडून राजापूर आगाराला अशा पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ गाड्या प्राप्त झाल्या असून, यामुळे आता राजापुरातील प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

​राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्री म्हणून कार्यभार घेतल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एस.टी. प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देताना त्यांनी एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात नवीन गाड्या आणण्यावर भर दिला असून, यापूर्वी राज्यातील सर्व आगारांमध्ये लालपरी या नवीन बस देण्यात आल्यानंतर आता नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. राजापूर आगाराला यापूर्वी आमदार किरण सामंत यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे दहा ‘लालपरी’ या नवीन बस उपलब्ध झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा आमदार किरण सामंत यांनी विशेष लक्ष घातल्याने रविवार रोजी नवीन पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस राजापूर आगारात दाखल झाल्या असून, रत्नागिरी विभाग नियंत्रकांकडून या गाड्या राजापूर आगाराला देण्यात आल्या आहेत.

​भगव्या व सफेद रंगाचा पट्टा असलेली आणि ‘२ बाय ३’ अशी प्रवाशांची आसन व्यवस्था असलेल्या या नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसमध्ये एकूण ५५ प्रवासी आसन क्षमता आहे. या बसेसचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लांबच्या प्रवासात प्रवाशांना मोबाईल चार्जिंग करता यावे म्हणून आसनाच्या लगतच यु.एस.बी. चार्जिंग पॉईंटची (USB Charger) सोय करण्यात आली आहे, ज्याचा प्रवाशांना विशेष फायदा होणार आहे. राजापूर आगारात या पाच नवीन गाड्या उपलब्ध झाल्याने आगार प्रशासन व प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. राजापूर आगार प्रमुख अजित गोसराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन राजमाता जिजाऊ बसेस प्रारंभी ‘राजापूर ते रत्नागिरी’ या मार्गावर चालवल्या जातील आणि त्यानंतर विभाग नियंत्रकांच्या आदेशान्वये लांब पल्ल्याच्या मार्गांवर सोडण्यात येतील. राजापूर आगाराला आणखी लालपरी दहा व राजमाता जिजाऊ पाच अशा एकूण १५ नवीन गाड्या उपलब्ध झाल्यास आगारची प्रवासी सेवा अधिक दर्जेदार होणार असून, यासाठी आमदार किरण सामंत यांचा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search