सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेमुळे एकूण ८२ हजार ५८० मतदारांची नावे कमी झाली असून, जिल्ह्यातील मतदारसंख्येत ११.५० टक्क्यांची घट झाली आहे.
Follow us onसिंधुदुर्ग: जिल्ह्यात नुकत्याच पूर्ण झालेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण अर्थात ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या एकूण मतदारसंख्येत मोठी घट झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या प्रक्रियेमध्ये तब्बल ८२ हजार ५८० मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली आहेत. या मोठ्या बदलामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येत ११.५० टक्क्यांची घट झाली असून, याचा परिणाम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या या ‘एसआयआर’ प्रक्रियेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील त्रुटी दूर करणे हा असतो. यामध्ये प्रामुख्याने एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी झालेली दुबार नोंदणी शोधणे, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार किंवा मृत व्यक्तींची नावे यादीतून काढून टाकणे, तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या नोंदींची सखोल तपासणी करून त्या वगळणे, अशा बाबींचा समावेश होतो. या प्रक्रियेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारसंख्येत झालेली लक्षणीय घट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यास, सावंतवाडी मतदारसंघात सर्वाधिक ३० हजार ६४७ नावे कमी झाली आहेत. या मतदारसंघात एकूण २ लाख ३४ हजार ५१९ मतदार असताना, आता झालेली ही घट १२.८५ टक्के इतकी मोठी आहे. यावरून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पडल्याचे स्पष्ट होते.
त्यापाठोपाठ कुडाळ विधानसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणावर कपात झाली आहे. कुडाळमध्ये २ लाख १९ हजार २४४ मतदारांपैकी २७ हजार ४५६ मतदारांची नावे कमी करण्यात आली असून, येथील घट १२.५२ टक्के इतकी आहे. अशा प्रकारे कुडाळमध्येही एसआयआर प्रक्रियेनंतर मतदार यादीत आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येत आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विचार करता, येथे २ लाख ३४ हजार २५१ मतदारांपैकी २४ हजार ९८५ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. येथील घट १०.६७ टक्के असली, तरी २५ हजारांच्या आसपास नावे कमी होणे हीदेखील मोठी संख्या मानली जात आहे. आता या मोठ्या घटीचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मतदारनिहाय कारणांची सविस्तर आकडेवारी समोर येणे महत्त्वाचे ठरणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदललेल्या अंतिम मतदार यादीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.


