मुंबई: महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले असून, येत्या १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली असून, ज्या चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येत नाही, त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मुद्दाम मराठी बोलण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने हा कठोर निर्णय घेतला आहे. मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत संपूर्ण राज्यात विशेष परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल.
मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, वास्तव्याच्या ठिकाणची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतानाच, दुसऱ्या राज्यात व्यवसाय करताना तेथील भाषेचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ चालकांवरच नव्हे, तर नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही शासन कठोर कारवाई करणार आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवेत मराठी भाषेचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.


