मुंबई:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या बस आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक तिकिटामागे दोन रुपये ‘स्वच्छता अधिभार’ (Cleanliness Surcharge) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, यामुळे एसटी प्रवासासाठी आता प्रवाशांना अतिरिक्त दोन रुपये मोजावे लागणार आहेत. विशेषतः ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत १०० टक्के सवलत मिळणाऱ्या प्रवाशांनाही आता हे दोन रुपये द्यावे लागत असल्याने अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
या नवीन नियमामुळे बसमध्ये सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक यांच्यात शाब्दिक चकमकी होत असल्याचे समोर आले आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी पूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत होती, ते आता अतिरिक्त दोन रुपये देण्यास टाळाटाळ करत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून यूपीआय (UPI) पेमेंटचा पर्याय उपलब्ध असला तरी, गेल्या आठवड्यात सर्व्हर डाऊन असल्याने प्रवाशांच्या खात्यातून पैसे कापले जाऊनही महामंडळाच्या खात्यात ते जमा होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे मशीनमधून तिकीट निघत नसल्याने वाहकांची मोठी पंचाईत होत आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. महामंडळाची ही स्वच्छता योजना हेतूने चांगली असली तरी, दोन रुपयांच्या वसुलीमुळे रोज सुमारे अडीच लाख अमृत ज्येष्ठ नागरिक आणि वाहकांमध्ये वाद होत आहेत. या वादांमुळे एसटीची बदनामी होत असून, प्रशासनाने यावर काहीतरी सुवर्णमध्य किंवा तोडगा काढावा, अशी मागणी बरगे यांनी केली आहे. दरम्यान, ‘महिला सन्मान योजना’ आणि इतर सवलतधारक प्रवाशांच्या बाबतीत हा अधिभार नक्की कसा लागू राहील, याबाबत अद्याप काही संभ्रम कायम आहेत.


