नवी दिल्ली:उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाट्याला मध्य रेल्वेकडून येत असलेल्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत आवाज उठवला आहे. मध्य रेल्वेचे धोरण ‘उत्तर भारत केंद्रित’ असल्याचा आरोप करत सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांना एक सविस्तर पत्र सादर करून कोकणवासीयांच्या भावना आणि आकडेवारीनिशी रेल्वेचा दुजाभाव त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
खासदार सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे की, मध्य रेल्वेने १९ मार्गांवर एकूण १,५०० ‘समर स्पेशल’ गाड्यांचे नियोजन केले असताना, त्यातील तब्बल ४५० गाड्या बिहारसाठी आणि ३३२ गाड्या उत्तर प्रदेशसाठी सोडल्या आहेत. याउलट, मुंबईतून लाखो प्रवासी ज्या कोकण मार्गावर अवलंबून असतात, तिथे केवळ ३६ गाड्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, उत्तर भारतासाठी धावणाऱ्या गाड्या दररोज उपलब्ध आहेत, तर मुंबई-मडगाव विशेष गाडी १६ एप्रिल ते ११ जून दरम्यान आठवड्यातून केवळ एकदाच सोडली जाणार आहे. हा विरोधाभास संतापजनक असून कोकणी प्रवाशांची क्रूर थट्टा असल्याची टीका सावंत यांनी केली आहे.
नियमित गाड्यांची स्थितीही बिकट असून मांडवी, कोकण कन्या, जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस सारख्या गाड्यांच्या स्लीपर क्लासची वेटिंग लिस्ट १०० च्या पुढे गेली आहे. सध्या कोकणातील रस्त्यांची दुरवस्था आणि घाटातील वाहतूक कोंडी पाहता रेल्वे प्रवास हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे, मात्र रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दादर-रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करावी, विशेष गाड्यांच्या फेऱ्या ‘दररोज’ कराव्यात आणि अतिरिक्त रेक्स (डबे) उपलब्ध करून द्यावेत, अशा प्रमुख मागण्या त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या आहेत. हा अन्याय त्वरित दूर न झाल्यास कोकणच्या जनतेचा उद्रेक होईल आणि तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही अरविंद सावंत यांनी यावेळी दिला.


