मुंबई: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने वाहन संख्या आणि टोल वसुलीमध्ये नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या ७०१ किमी लांबीच्या महामार्गावरून तब्बल १.५५ कोटी वाहनांनी प्रवास केला. या माध्यमातून वर्षभरात १,२४०.०४ कोटी रुपयांचा टोल महसूल गोळा झाला असून, हा आकडा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४९९.४१ कोटी रुपयांनी अधिक आहे. समृद्धी महामार्गाच्या इतिहासात टोल वसुलीने एकाच वर्षात १,००० कोटींचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या महामार्गाच्या प्रवासाकडे नजर टाकल्यास, २०२२-२३ मध्ये जेव्हा हा मार्ग अंशतः खुला झाला होता, तेव्हा पहिल्या चार महिन्यांत १३.५९ लाख वाहनांमधून १०६.४१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यानंतर २०२३-२४ मध्ये वाहनांची संख्या ६८.९९ लाखांवर पोहोचली आणि ५२८.१० कोटींचा टोल जमा झाला. २०२४-२५ मध्ये वाहनांच्या संख्येने १ कोटीचा टप्पा पार केला होता, ज्यातून ७४० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. १० जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण मार्गिकेचा वापर सातत्याने वाढत असून, आतापर्यंत एकूण ३.४४ कोटी वाहनांनी यावरून प्रवास केला आहे आणि त्यातून एकूण २,६६० कोटी रुपयांचा टोल जमा झाला आहे.


